लहानपणापासून
पन्हाळगड ते विशाळगडाचा इतिहास वाचत आलोय. बाजीप्रभू, शिवा काशीद ह्यांचे स्वराज्यासाठी बलिदान. अनेकवर्षांची
इच्छा होती कि एकदा तरी ह्या वाटेने मार्गक्रमण करावे असे वाटत होते. पण काही
कारणामुळे जमून येत नव्हते. ऑगस्ट मध्ये लागून सुट्टी असल्यामुळे पन्हाळगड ते
पावनखिंड अशी २ दिवसात ५५ किलोमीटरची मोहीम आखली. डोंगरमित्रांना संदेश पाठवले.
सगळे एकाच फटक्यात तयार झाले. एवढी ऐतिहासिक मोहीम कोण सोडणार? शुक्रवारी
संध्याकाळच्या सह्याद्री ट्रेन ने कोल्हापूरची प्रस्थान केले.
त्याआधी ह्या
लढाईचा थोडा इतिहास जाणून घेऊ. शिवकाळात १२ व १३ जुलै १६६० या दिवशी पन्हाळगड ते विशाळगड
मार्गावर प्रचंड रणकंदन घडले. रयतेचे स्वराज्य निर्माण करणार्या शिवछत्रपतींच्या
रक्षणार्थ शेकडो मावळ्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली. विजापूरचा सरदार सिद्धी
जौहरने प्रचंड सैन्यासह पन्हाळगडाला वेढा दिला. यातून निसटून सुरक्षित बाहेर
पडण्यासाठी शिवछत्रपतींनी गनिमी काव्याची योजना आखली. भर पावसात रात्रीच्या अंधारात
दुर्लक्षित झालेल्या जुन्या मार्गाने विशाळगडाकडे जाण्यासाठी ते बाहेर पडले.
आदिलशाही सैन्याला चकवा देण्यासाठी दोन वेगवेगळ्या मार्गांनी दोन पालख्या
पन्हाळगडावरून बाहेर पडल्या. एका पालखीत स्वत: शिवराय तर दुसर्या पालखीत हुबेहूब
त्यांच्यासारखी वेशभूषा केलेले शिवा काशीद होते. योजनेनुसार सर्व सुरू असताना शिवा
काशीद यांची पालखी आदिलशाही सैनिकांना दिसली. त्यांनी शिवा काशीद यांना ताब्यात
घेतले. दरम्यान, मिळालेल्या
वेळेचा पुरेपूर फायदा घेत शिवछत्रपतींनी विशाळगडाकडे कूच केली. मराठा सैन्यातील रायाजी बांदल, बाजी व फुलाजी
प्रभू देशपांडे, संभाजी जाधव,
विठोजी काटे असे अनेक ज्ञात-अज्ञात मावळे कामी
आले. स्वत: शिवछत्रपतींनीही विशाळगडच्या पायथ्याशी लढाई करत आपली सुटका करून
घेतली.
शनिवारी सकाळी ६ वाजता
कोल्हापुरात पोहोचलो त्यावेळी हलका पाऊस पडत होता. लगेच जीप मध्ये बसलो आणि
पन्हाळगडाकडे मार्गस्थ झालो. पन्हाळगडाला शिरतानाच उजव्या बाजूला शिवा काशिदच्या
पुतळ्याला वंदन करून आत मध्ये गेलो. मित्रवर्य केदार मुंडलेने आमची चहा नाश्त्याची
मस्तपैकी सोय केली होती. शार्प १० वाजता जास्त वेळ न दवडता बाजी प्रभूंच्या पुतळ्याला
वंदन केले आणि शिवगर्जनेसह राजदिंडी मार्गे खाली उतरायला सुरवात केली. साधारण
तासाभरात मसाई पठाराच्या सुरवातीला असलेल्या महाळुंगे गावात पोहोचलो. हीच काय ती
एकमेव चढाई ह्या संपूर्ण मोहिमेत. बाकी सगळी तंगडतोड. एका घराच्या पडवीत विसावलो, तसे
घरातल्या लहान पोराने कळशीभर पाणी आणून ठेवलं. काही म्हणा पण आदरातिथ्य अनुभवायचं
तर ते सहयाद्रीमधे. आता या लहान मुलाचं बघा. अंदाजे ८/९ वर्षाचा असेल. पण एक साधी
गोष्ट त्याला कळली आपल्या घरी कोणीतरी आलाय त्याला पाणी हवाय का न विचारता समोर
कळशीच आणून ठेवलीं. कौतुक वाटलं मुलाचं.
थोडी चढाई करून
मसाई पठारावर पोहोचलो. आफ्रिकेचे जसे माळरान आहे, तसे विस्तीर्ण
हिरवागार पठार. अदमासे १० किलोमीटर लांब. येथून आमचा पहिला थांबा होता १२
किलोमीटरवर असलेलं खोतवाडी. फार वेळ न दवडता चालायला सुरवात केली. वातावरण ढगाळ
होतं. तासाभराने मसाई देवीचं देऊळ लागलं. दर्शन घेतलं जरा विसावलो. पाऊस
नसल्यामुळे चारही दिशा स्पष्ट दिसत होत्या. नाहीतर पाऊस आणि धुकं असतं तर ह्या
देवळापासून वाट चुकायची खूप शक्यता असते. आणि त्यात आम्ही वाटाड्या पण घेतला
नव्हता. वातावरणात बदल व्हायच्या आत आम्ही तिकडून काढता पाय घेतला. वाटेत आम्हाला २ गुराखी मामा भेटले. दोन्ही कडून राम राम झालं. इकडच्या तिकडच्या
गप्पा झाल्या. मामा म्हणाले थोडा पुढे गेलात कि पांडवकालीन लेणी आहेत ती पण बघून
घ्या. पण वेळेअभावी आम्हाला जमलं नाही. त्यांच्याकडून वाट समजावून घेतली आणि
वाटेला लागलो. ऊन पावसाचा मस्त खेळ चालू होता मधेच एखादी पावसाची सर येऊन आम्हाला
ताजेतवाने करून जायची. मसाई पठारावरून खाली उतरून कुंभारवाडी मध्ये पोहोचलो.
कुंभारवाडी ते खोतवाडी हा ३ किलोमीटरचा सगळा डांबरी रस्ता. डांबरी रस्त्यावर
चालायचा लई कंटाळा येतो. आणि त्यात भर म्हणजे पाऊस अजिबात नव्हता, म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. कुंभारवाडी
सोडली कि डाव्याबाजूला डोंगरावर आपल्याला स्तंभ दिसतात. हा परिसर म्हणजे
"कुंवारखिंड". इथे कुंवारी देवीची मुर्ती आहे. या ठिकाणी एका काळ्या
खांबात कुमारी अदॄष्य झाली असे मानतात. गावकरी याला डोंगरात नाहीसे झालेले वर्हाड
मानतात पण ज्वालामुखीजन्य स्तंभांची पाउस आणि वार्यामुळे झीज होउन हि रचना झालेली
आहे. एकावर एक ठेवल्यासारखे दगड म्हणजे निसर्गाचे अनोखे शिल्प आहे.
दुपारच्या
जेवणाचं गवळी मामांना आधीच सांगून ठेवलं होतं. आमची वाट बघताच होते, आम्हाला जरा जास्तच उशीर झाला होता. लगेच हाथ
पाय तोंड साधुवून ताजेतवाने झालो. तो पर्यंत मामांच्या मुलाने आमची ताटे पण वाढून
ठेवली होती. गरम गरम तांदुळाच्या भाकऱ्या, कांदा टोमॅटोचा रस्सा, भात, खास कोल्हापुरी चटणी आणि
पापड असा चविष्ट मेनू. पोटात प्रचंड कावळे काव काव करत होते. जेवणावर तुटून पडलो.
आणि मस्तपैकी अंगणात ताणून दिली.
आता पुढचा
मुक्काम होता कर्पेवाडी कदम मामांकडे. अंधार व्हायच्या आतमध्ये काही करून मुक्कामाला पोहोचायचे होते. दुपारचे ३. ३० वाजले होते. गवळी कुटुंबाला निरोप देऊन आम्ही
कर्पेवाडीच्या वाटेला लागलो. वाटेत चापेवाडी, केळेवाडी, तालेवाडी,
पेढेवाडी, मंडलाईवाडी अशा छोट्या छोट्या वाड्या लागल्या. कधी एकदा
कर्पेवाडीत पोहोचतोय असं झालं होतं. अभय,केदार,रोहित,देवेश, कल्पेश,निषाद आणि धनश्री
असे पुढे निघून गेले होते. एका टुमदार घरात मालकाच्या परवानगीने विसावलो. त्या भल्या
माणसाने दूध हवाय विचारलं. मी, नितीन,विराज आणि मानसी ह्यांनी लगेच होकार दिला. मस्त
गरम गरम दूध प्यायल्यावर हुरूप आला. त्या भल्या माणसाने अंगणात पसरलेल्या शेंगा पण
दिल्या. त्यांचा निरोप घेऊन मार्गस्थ झालो. वाटेत छोटे छोटे झरे , भाताची शेतं ओलांडत संध्याकाळी ६ च्या सुमारास
कर्पेवाडी मध्ये पोहोचलो. ताजेतवाने झाल्यावर विराजने सगळ्यांचं stretching
exercise करून घेतले. बरं वाटलं. त्याबद्दल त्याचे आभार. रात्री मस्त
पैकी गरम गरम जेऊन लगेच झोपी गेलो. पाठ टेकवल्याक्षणी झोप लागली. साधारण २५
किलोमीटरची चाल झाली होती.
सकाळी थोडं लवकर
उठून आन्हिक उरकली. काल रात्रीच मामानं सकाळी आम्हाला दूध हवाय म्हणून
सांगितलं होत. मस्त न्याहारी आणि दूध पिऊन कदम मामांना निरोप दिला. आता पुढचा
मुक्काम होता पावनखिंड. काळकाई वाडी ,पातेवाडी नंतर नितांत सुंदर असा
जंगलपट्टा लागतो. पाटेवाडीपासून दिड तासात पायपीट केल्यावर आम्ही सुकामाच्या
धनगरवाड्यात पोहोचलो. यानंतर पाउण तासात म्हसवडे आणि तासाभरात माण
धनगरवाड्यामार्गे चालल्यानंतर मलकापूर - पांढरपाणी रस्त्यावर आलो. मध्ये एका
ठिकाणी खूप चिखल असल्यामुळे आमचा खूप वेळ गेला. ४ वाजत आले होते आणि अजूनही
पावनखिंड ४ किलोमीटर लांब होती. एकंदर सगळ्याला वेळ झाला होता. थोडासा नियोजन
गडबडल होतं. पण नशिबाने शेवटचा १ किलोमीटर राहिला असताना लाल डब्याने साथ दिली आणि
शेवटी आम्ही पावनखिंडीत पोहोचलो.
पार्किंगच्या
जागेपासून दगडी पायर्याच्या मार्गाने पावनखिंडीपर्यंत जायचे. पायर्यांवरुन खाली
उतरल्यानंतर ढाल आणि तलवारीच्या स्वरुपात हे स्मारक उभे केले आहे.एका दगडी शिळेवर
कमळात पिंड कोरलेले स्मृतीचिन्ह आहे. त्याखाली "स्वराज्यासाठी प्राणार्पण
करणार्या ज्ञात अज्ञात वीरांच्या स्मरणार्थ" अशी संगमरवरी पाटी आहे. तिकडे एका
रिसॉर्ट वरून लोक आले होते त्यांना गाईड सगळं प्रसंग सांगत होता. तो ज्या
तऱ्हेने सांगत होता त्याने अंगावर काटा
येत होता. खरंच बाजी प्रभूंचा पराक्रम खूप. आपल्या स्वराज्यासाठी प्राणांची आहुती
दिली. आम्ही सगळ्यांनी वंदन करून पार्टीच्या वाटेल निघालो. विराजने, अरे रक्तात
रक्तात भिनलंय कोण? जय जिजाऊ जय
शिवराय अशा मोठ्याने गर्जना देत सगळं परिसर शिवमय करून टाकला. शिवाजीराजे आणि
बाजीप्रभूंची जिथे उभे राहुन शेवटची गळाभेट झाली असेल तिथे आम्ही प्रत्यक्ष उभे
होतो. अतिशय रोमांचकारी क्षण होता. खरं तर पाय निघत नव्हता, पण साश्रू नयनांनी आम्ही निघालो.
मिलिंद देशमुख