जून महिन्यात matheran
via one tree hill point आणि फारसा परिचित
नसलेला मुळशी धरणाला लागून असलेला कैलासगडच्या वाटेला लागून झाले होतं. पूर्ण जुलै
मध्ये काही प्लान बनलाच नाही. नाही म्हटलं तरी एक बाईक राइड झाली होती.
ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात वडगाव ते
प्रतापगड असा तंगडतोड ट्रेक करायचे ठरवले होते, पण पावसाने आपला इंगा दाखवल्यामुळे तो आधीच
रद्द करून टाकला. मग ठरवलं गोप्या घाट उतरून शिवथरघळला जायचे. समर्थांच्या
सानिध्यात एक दिवस काढायचा. पण बहुदा समर्थांच्या मनात नसावं कारण वरंधा घाट पण
खचला अशी बातमी आली त्यामुळे तो पण रद्द
करावा लागला. आता असा मस्त पाऊस पडत असताना ठरवलेला रविवार पण घरीच काढावा लागतोय
कि काय असं वाटू लागला. पण तेवढ्या काही वर्षांपूर्वी Rohington Mehta चे ६० Hiking & Trekking Routes हे माथेरान वर पुस्तक वाचनात आले होते. मग त्या
मधलीच एक वाट करू अशी योजना आखली. तसं आधी
Garbett Plateu आणि One
Tree Hill वाट झाली होती.
गुगल भाऊंना
कामाला लावलं. Alexander Point चढून Rambaug Point उतरायचा असं ठरवले. लगेच मित्रमंडळींना संदेश पाठवले.
बऱ्याच मित्रांना वेळ नव्हता. शेवटी आम्ही मी, निषाद, धनश्री आणि कल्पेश
४ जण उरलो.
नेहमीप्रमाणे शनिवारी रात्रीची शेवटची कर्जत लोकल पकडून पहाटे पहाटे ३ वाजता कर्जत
स्थानकात उतरलो. स्थानकाच्या बाहेर एक काका सकाळी ३ ते ८ ह्या वेळेत मस्त मराठमोळा
घरगुती नाश्ता घेऊन बसतात. मस्त गरम गरम खिचडी, उपमा, वडे असा पोटभर
नाश्ता केला. पायथ्याच्या गावाला जाण्यासाठी आद्ल्यादिवशीच टॅक्सी सांगितली होती.
पण काकांचा दूरध्वनी काही लागत नव्हता. मग आम्ही मोर्चा कर्जत स्थानकात
वळवला. थोडावेळ सगळे पहुडलो. ५ वाजता
काकांचा दूरध्वनी लागला. गजर न झाल्यामुळे काकांना जाग जरा उशिरानेच आली. ५. ४५ ला
एकदाचे आम्ही पोखरवाडी गावाकडे मार्गस्थ झालो. वातावरणात मस्त गारवा जाणवत होता.
पाऊस भुरभुरत होता. गाडी मोरबे धरणाच्या रस्त्याला लागली. ह्यावर्षी भरपूर पाऊस
झाल्यामुळे धरण तुडुंब भरले होते. काही काही भागात तर धरणाच पाणी रस्त्याला खेटून
होतं.
पोखरवाडी गावात
पोहोचलो. तिकडून आम्हाला बुरुजवाडी गावातून जायचं होतं. बुरुजवाडीत जायला तुम्हाला
पायपिटच करावी लागते. थोडासा मुख्य रस्त्यापासून गाव आत मध्ये आहे. नकाशा डोक्यात
बसल्यामुळे एका ठिकाणी गाडी थांबवली. पण नक्की हीच वाट आहे का, हे कळत नव्हता आणि इतक्या सकाळी रस्त्यावर
चिटपाखरूही नव्हतं. तेव्हड्यात एक बाइकवाला आला त्याने आम्हाला नीट वाट समजावून
सांगितली. आम्हाला वाटत होती तीच वाट होती पण थोडी धाकधूक होती आणि पहिल्यांदीच
चुकीच्या वाटेल लागलो तर वाट शोधायच्या नादात आमचीच वाट लागायची.

भुरभूरणाऱ्या
पावसाच्या साथीनं चालायला सुरवात केली, सुरवातीलाच एक ओढा ओलांडून साधारण १०० मीटर चढाई करत एका टेपाडयावर येऊन पोहोचलो. पूर्वेच्या दिशेला
सोंडाई किल्ला थेट ढगात घुसला होता. समोरच्या चांगेवाडीचे २ छोटे धबधबे कोसळत
होते. त्याच्याच मागे Garbett Plateau आणि उत्तरेला माथेरान ढगात हरवले होते. बराच वेळ सगळा परिसर न्याहाळा आणि
प्रकाशचित्रांचा किलकिलाट करून बुरुजवाडीच्या वाटेल लागलो. साधारण २०/२५ उंबराचे
गाव. पोटापाण्यासाठी थोडी शेती. बाकी रोज दूध, दही आणि खवा माथेरानच्या बाजारपेठेत बिकायचा. गावात चौथी
पर्यंतची शाळा.

गावात एका मामानं
Alexander ची वाट विचारल्यावर
त्यांनी वाट दाखवली पण सांगितलं कि पाऊस आहे तर त्या वाटेने जाऊ नका. त्यापेक्षा
तुम्ही Rambaug Point ने जा, वाट रोजच्या वापरातली आहे. त्यामुळे थोडे हिरमुसलो. गाव मागे टाकून एका
छोट्या टेपाडावर चढलो. समोरच्या डोंगरावरून असंख्य छोटे मोठे धबधबे स्वतःला
जमिनीवर झोकून देत होते. बाजूला भात शेती होती. वाटेत एक मस्त ओढा लागला. थोडावेळ
ओढ्यात बसून सगळं शिन घालवला, आणि पुढे वाटेल लागलो. वाटेत एका ठिकाणी २ थडगी
दिसली. त्यावर रंगीबेरंगी माळा पसरलेल्या होत्या. ह्या इतक्या आडरानात हे असा
पहिल्यांदीच बघत होतो. आणि ह्या इथे मुस्लिम समाज पण नाही आहे हे पक्का माहित होतं
. जास्त विचार न करता तिकडून काढता पाय घेतला आणि डोंगराच्या धारेला बिलगलो.
आरामदायी चढ होती. ऊन पावसाचा खेळ चालू होता. वरच्या टेपाडावर आलो आणि मन एकदम
प्रसन्न झाले. समोरच मोरबे जलाशय पहुडला होता. त्याच्या बाजूलाच आम्ही जिथून ट्रेक
चालू केला ती वाट एकदम स्वछ दिसली. आम्ही कोणत्या वाटेने आलो ती बघत बराच वेळ
तिकडे बसून राहिलो. भर्राट वर होतं त्यात जोराचा पाऊस सुरु झाला. बारीक बारीक थेंब
काट्यासारखे टोचत होते. एकदम कळसूबाईची आठवण झाली. अर्थात कळसूबाई पुढे हे किस झाड
कि पत्तीच. चालत येत नव्हता इतका जोरदार पाऊस पडत होता, तेवढ्या समोरच एक झाप दिसला तिकडे सगळ्यांनी थोडा आडोसा
घेतला. शेवटच्या चढणीवर असताना एक आजोबा माथेरानला दुध आणि दही देऊन परतत होते.
त्यांच्याशी थोड्या गप्पा झाल्या. आजोबांचं कौतुक वाटलं. इतक्या वयात पण हसतमुखाने
काम करत होते. रोज सकाळी ३ तास चढून हॉटेल वाल्याला विकून परत यायचं. आपण इथे
नाक्यावरून काही आणायला सांगितलं तरी कंटाळा करतो. शहरापासून इतक्या लांब, दळणवळणाची साधन फार कमी. मुख्य रस्ता सुद्धा ४५
मिनिटे दूर. आता पर्यंत असे बरेच जण भेटले. पण सगळे हसतमुख, कोणाच्याही कपाळावर आठी नाही. येताना जी थडगी दिसली
त्याबद्दल आजोबाना विचारला झाली. ती आदिवासी लोकांची थडगी होती. आजोबा म्हणाले कि
आदिवासी लोक जाळत नाहीत ते पुरून टाकतात.

आजोबाना निरोप
देऊन शेवटची चढाई चालू केली आणि एकदाचे वर आलो. पुढे एक वाट जंगलात घुसत होती.
आम्हाला वाटलं आता १५/२० मिनिटं मध्ये Rambaug Point ला लागू पण आमचा भ्रम लगेच दूर झाला. चाल खूप होती पण अतिशय
सुखावह होती. पूर्ण वाट जंगलामधील होती. डाव्या बाजूला पूर्ण कातळ होतं. तिकडून
असंख्य धबधबे पडत होते. पाऊस मी म्हणत कोसळत होता, पक्षी शिळ घालत होते. साधारण ४५ मिनिटे चाल झाल्यावर Rambaug
Point ला आलो. बाजूलाच एका घरात
गरम गरम चहा सांगितला. तिकडे एक बोरिवलीचेच एक महाजन म्हणून काका भेटले. आम्ही
ज्या वाटेने आलो तिथूनच ते आले होते. वय वर्ष फक्त ६६. ते बोलले मी एकटाच फिरतो.
निवृत्त आहे. आता काही कामधंदा नाही. घरी बसण्यापेक्षा अस फिरायचं. असे लोक भेटले कि हुरूप येतो.

थोडावेळ आराम
करून बाजारपेठे मध्ये जायला निघालो. पोटात कावळे काव काव करत होते. मुख्य वाटेल
लागल्याबरोबर माणसांचा गोंगाट सुरु झाला. इतक्या ४ तास फक्त वाऱ्याच्या आणि
पक्ष्यांचा आवाज ऐकत होतो आणि तो एका क्षणात भंग झाला. आमच्या नेहमीच्या
हॉटेलमध्ये मिसळीवर मस्तपैकी ताव मारला आणि माणसांच्या भाऊगर्दीत आम्ही पण सामील
होऊन परतीच्या वाटेला निघालो. मनाने
ताजेतवाने होऊन आणि खूप आनंददायी असा माथेरानचा ट्रेक झाला आणि अशाच अजून
माथेरानच्या वाट करायची गाठ बांधली.
मिलिंद देशमुख
No comments:
Post a Comment