Wednesday, October 2, 2019

गोप्या घाट ते शिवथरघळ... एक रात्र समर्थांच्या सहवासात.


गिरीचे मस्तकी गंगा । तेथुनि चालली बळे ।

धबाबा लोटती धारा । धबाबा तोय आदळे ॥ १ ॥

गर्जता मेघ तो सिंधू । ध्वनीकल्होळ ऊठिला ।

कड्याशी आदळे धारा । वात आवर्त होतसे ॥ २ ॥



तुषार उठती रेणू । दुसरे रज मातले ।
वात मिश्रित ते रेणू । सीत मिश्रित धूकटे ॥ ३ ॥



दराच तुटला मोठा । झाड खंडे परोपरी ।
निबीड दाटती छाया । त्या मधे वोघ वाहती ॥ ४ ॥



गर्जती श्वापदे पक्षी । नाना स्वरे भयंकरे ।

गडद होतसे रात्री । ध्वनी कल्लोळ ऊठती ॥ ५ ॥
कर्दमू निवडेना तो । मानसी साकडे पडे ।

विशाळ लोटती धारा । ती खाले रम्य वीवरे ॥ ६ ॥

विश्रांती वाटते तेथे । जावया पुण्य पाहिजे ।

कथा निरुपणे चर्चा । सार्थके काळ जातसे ॥ ७ ॥

समर्थ रामदास




Trek Route GPS


बऱ्याच वर्षांपासून समर्थांच्या शिवथरघळीत एक रात्र घालवायचा विचार होता. तसा ४/५ वेळा गाडीमार्गाने जाऊन आलो होतो पण ह्यावेळेस जरा वेगळ्या मार्गाने शिवथरघळीत जायची योजना आखली. पुरातन काळापासून कोकण आणि देश ह्यांना जोडणाऱ्या बऱ्याच घाटवाटा सहयाद्रीमध्ये आहेत. तोरणा आणि राजगड वरून पायवाटेने शिवथरघळी मध्ये जायला मढे घाट, उपांड्याची नाळ, आंबेनळी आणि गोप्या घाट अशा वाट प्रचलित आहेत. मागील वर्षी आम्ही मढे घाट आणि उपांड्याची नाळ या वाटेला लागून झालो होतो. ह्यावेळी गोप्या घाट ते शिवथरघळ ट्रेक आखला.


शनिवारी सकाळीच ४ वाजता मुंबई सोडली. तोरणा किल्ल्याच्या पायथ्याला वेल्हे गावात पोहोचलो त्यावेळी सकाळचे ११ वाजले होते. कदम काकांच्या हॉटेलात भरपेट खाऊन गोप्या घाट सुरु होतो त्या बोपे गावात पोहोचायला दुपारचा १. ३० वाजला.  गाडीवाल्याला सांगितलं तू वरंधा घाटातून शिवथरला ये.



बोपे गावाचे लोकेशन लै भारी, घाटमाथ्यावरील कोकणी ढंगाचे सुंदर आणि स्वछ गाव. गावातील एका मामांना वाट विचारून घेतली आणि आम्ही लगेच मार्गस्थ झालो. सर्वत्र पसरलेली सोनकी, हिरवे डोंगर आणि निळे आकाश ह्यांचा सुंदर मिलाप न्याहाळत घाटाच्या तोंडाशी आलो. पाऊस नसल्यामुळे चाल सुखावह होती. घाटाच्या सुरवातीलाच पाण्याचं टाकं आहे. अशा अनेक घाटवाटा करताना अशी टाकी नजरेस पडतात.



                                                               गोप्या घाटाची सुरवात 

आजही अशा घाटवाटा गावकरी दळणवळणासाठी वापरतात. उतरायची वाट एकदम सुखावह होती. भास्करराव आमच्या पर्यंत पोहोचायला नकोत ह्याची काळजी झाडांनी घेतली होती त्यामुळे थंडगार वाटत होत. 


 काही वेळाने एका टेपाडावर पोहोचलो आणि समोर दिसणाऱ्या विहंगम दृश्याने वेड लागलं. समोर पसरलेली शिवथर व्हॅली, समोरचे काळेभोर आणि हिरवे डोंगर त्यावर ढगांनी चढवलेला मुकुट, मागे निळे आकाश. मागच्या दिशेला गोप्या घाट उतरून आलो त्या डोंगरमधील खाच स्पष्ट दिसत होती.




आणि त्यात भर म्हणजे इंद्रधनुष्य. मन प्रसन्न करणार वातावरण. बराच वेळ ते दृश्य डोळ्यात साठवून बघत बसलो होतो. मनसोक्त छायाचित्रणाचा आनंद लुटला. खरं तर पाय निघत नव्हता, पण अंधार लवकर पडत असल्यामुळे लवकर शिवथरघळ गाठायची होती त्यामुळे निघावं लागलं. वाटेत धनगर वाडा मागे टाकून हिरव्यागार भातशेती मधून वाट काढत कसबे शिवथरघळला पोहोचलो. अंधार पडत होता.  ट्रेक मधला सगळ्यात कंटाळवाणा प्रकार  म्हणजे डांबरी रोड वरची चाल . खरं सांगतो मित्रांनो जीव निघतो. ४५ मिनिटाची ती कंटाळवाणी चाल करून एकदाचे आम्ही शिवथरघळीत पोहोचलो.

शिवथरघळीत पोहोचल्यावर पहिला धक्का मिळाला ते आमचा ड्राइवर गाडी घेऊन पोहोचलाच नव्हता. कोणाच्याच मोबाईलला रेंज नसल्यामुळे काही कळायला मार्ग नाही. त्यात आमचे सगळे कपडे गाडीत. नशीब पाऊस नव्हता पण सुखे होतो नाहीतर तसाच झोपावं लागला असता. त्याहून दुसरा धक्का म्हणजे वरंधा घाट खचल्यामुळे गेले २ महिने बंद आहे. आली का पंचईत. तिकडच्या काकांचा फोन घेऊन ड्राइवर ला फोन केला तर तो नशिबाने लागला. घाटात एका स्पॉट वर रेंज येतं होती म्हणून पठ्ठया तिकडेच थांबला होता. त्याला सांगितलं तू तिथेच गावात कुठेतरी राहा आणि उद्या ह्याच स्पॉट ला सकाळी येऊन उभा राहा आम्ही काहीही करून तिकडे येतो. काकांनी आमची जेवायची झोपायची सगळी व्यवस्था केली.  उद्या तिकडे कस जायचा ते नीट सांगितलं. 



ताजेतवाने होऊन सुंदर मठात गेलो, तिकडे समर्थांच्या मूर्तीसमोर भाविकांची आरती चालू होती. दर्शन घेऊन गुहेत गेलो. दासबोध इथेच लिहिला गेला. अप्रतिम जागा.  घळईत राहणे म्हणजे सुखद अनुभव. कोसळणाऱ्या धबधब्याचा आवाज होता तरीसुद्धा एक वेगळ्या प्रकारची शांतता होती. आजूबाजूला घनदाट जंगल. त्यावेळेस म्हणजे साधणार ४०० वर्षांपूर्वी इथली परिस्थिती काय असेल. कशी शोधली असेल समर्थानी हि जागा? ह्या विचारातच कधी गाढ झोप लागली हे समजलचं नाही.



दुसऱ्यादिवशी सकाळी ५.३०  ला उठून सगळे तयार झालो. ६.४५  ची शिवथर कल्याण लालडब्ब्याने आम्ही बारस फाट्याला उतरलो. तिकडे एका टमटम वाल्याला पटवलं. तो तयारच नव्हता घाटात यायला. त्यांना आमचा प्रॉब्लेम सांगितलं. त्याला सांगितलं तुमची टमटम जिथपर्यंत जाईल तिकडे सोडा. तयार झाला. साधारण ८ वाजता आम्ही घाटात पोहोचलो. एका बाईक वाल्याला पकडला. कल्पेशला त्याच्या बरोबर पाठवून आपली गाडी जितक्या जवळ येईल तोवर आणायला पाठवला. 




जिकडे सोडल ती जागा पण लै भारी होती. समोरच्या वरंधा दरीत ढग जमा झाले होते. उजव्या दिशेला आम्ही उतरलो तो गोप्या घाट दिसत होता. त्याच रेषेत आंबेनळी, उपांड्या, मढे, शेवत्या घाट नजरेस दिसत होते. आणि एकदम शेवटच्या टोकाला रायगड. वातावरण स्वछ असल्यामुळे हे सगळ्या दिसण्याचं भाग्य आम्हाला मिळाला. फोटोंचा किलकिलाट करून निघालो. थोडी चाल झाल्यावर आमची गाडी हजरच होती. लगेच गाडीत बसलो. 



पवारांच्या हॉटेलवर जाऊन फ्रेश झालो. मिसळकांदा भजी हाणली.


वाटेत नीरा देवघर धरणाच्या काठाने मुंबईला यायला निघालो पुढच्या घाटवाटेची आखणी आखणी करत. 


3 comments: